औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. काँग्रेसने तर इच्छुक यांची यादी राज्यस्तरीय समितीकडे पाठवली आहे. भाजप मध्ये मात्र अजूनही या कामाला वेग आलेला दिसत नाही. राज्यस्तरीय बैठक २१ जुलैला होणार असून त्या बैठकीनंतरच विधानसभेच्या तयारीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान दीडशे किलोमीटर पदयात्रा काढण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात भाजपचे नेते मंडळी तयारी करीत असल्याचे समजते. भाजप कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक येत्या २१ जुलैला होत असून या बैठकीनंतर विधानसभेच्या कार्यक्रम तयार होणार असल्याचे बोराळकर म्हणाले.
भाजपात इन्कमिंग होत आहे. अनेक पक्षांचे नेते पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी तयार आहेत. मात्र सध्या कुणालाही प्रवेश देण्यात येत नसल्याचेही ते म्हणाले. राज्यस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दीडशे किलोमीटर ची पदयात्रा काढण्यात येईल, असेही ते म्हणाले